विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्टेशनसमोर साईड देण्याच्या कारणावरून एका ऑटो रिक्षा चालकाला आणि त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार श्रावण बापूराव चव्हाण (वय २३, रा. लेंडवाडी, ता. परळी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपली ऑटो रिक्षा (क्रमांक MH22U2078) घेऊन घाटनांदूर येथे सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या मजुरांना सोडून परत येत होते.घाटनांदूर रेल्वे स्टेशनसमोर पाठीमागून येणाऱ्या अर्टिका कार (क्रमांक MH24AW6265) चालकाने हॉर्न वाजवला. त्यामुळे श्रावण यांनी आपली रिक्षा साईडला घेतली. मात्र, “हॉर्न वाजवूनही साईड का देत नाहीस?” असे म्हणत कारमधून उतरलेल्या व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रस्त्याच्या कडेला दगड असल्यामुळे ताबडतोब साईड देता आली नाही, असे श्रावण यांनी सांगितले.त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून गेला आणि काही वेळाने इतर तिघा जणांना सोबत घेऊन परत आला. चौघांनी मिळून श्रावण यांना हातातील लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.भांडणाचा आवाज ऐकून सोडवण्यासाठी आलेल्या तक्रारदाराची बहीण रेणुका दिलीप जाधव आणि सासू कविता भुजंग जाधव यांनाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत रेणुका यांच्या गळ्यातील पोत तुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी अर्टिका कारचा चालक अनिल लिंबाजी बडे (रा. चोपनवाडी, ता. अंबाजोगाई) आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब मुरलीधर डोंगरे करीत आहेत.

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.