गौतम बचुटे/केज:- चौकशी अहवाल तुमच्या बाजूने देतो, असे म्हणून 20 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र पैसे स्वतः न घेता सोबतच्या शिक्षकाकडे देण्याचा इशारा केला. पैसे खिशात ठेवताच तक्रारदार शिक्षकाने गळ्यातील रुमाल डाव्या हातात घेतला आणि त्याच इशाऱ्यावर दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोघांना रंगेहाथ अटक केली. ही थरारक घटना काल दि. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजता केजच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात घडली.

कुंबेफळ येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ कदम यांना तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी शालार्थ वेतन प्रणालीत अनियमितता केल्याबद्दल नोटीस दिली होती. या चौकशीसाठी विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.मुख्याध्यापक कदम यांनी लेखी खुलासा देऊनही दत्तात्रय चाटे यांनी अहवाल अनुकूल देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर 40 हजार रुपयांवर तडजोड झाली. लाच देण्याची इच्छा नसल्याने कदम यांनी जालना ACB चे पोलीस निरीक्षक जाधवर यांच्याशी संपर्क साधला.

रुमालाचा इशारा आणि सापळा

ACB ने 14 ऑक्टोबर रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सापळा रचला. कदम यांनी 20 हजार रुपये देण्यासाठी आणल्याचे सांगताच, चाटे यांनी शेजारी बसलेले सहशिक्षक जयगुरु गिरी यांच्याकडे पैसे देण्याचा इशारा केला. गिरी यांनी पैसे घेऊन पँटच्या खिशात ठेवताच, कदम कार्यालयाबाहेर आले आणि खांद्यावरील रुमाल डाव्या हातात घेतला. हाच इशारा मिळताच ACB पथकाने दोघांना ताब्यात घेतले.या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 654/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

लाचखोर दत्तात्रय चाटे आणि जयगुरु गिरी यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. 17 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

केज शिक्षण विभागात लाचखोरीचे रॅकेट?

या कारवाईनंतर केजच्या शिक्षण विभागातील अनेक गैरप्रकार चर्चेत आले आहेत. तक्रार देऊन ती मिटवण्यासाठी पैसे उकळणे, शाळा पोषण आहार आणि ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या निवास व भोजन व्यवस्थेत घोटाळा, तसेच बनावट विद्यार्थी दाखवून पदे वाचवण्याचे प्रकार सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच अनेक शिक्षक पोलीस ठाण्यात जमा झाले होते, मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर दुःखाऐवजी आनंद दिसत असल्याचे चित्र होते.

महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी बीड न्युज एक्सप्रेस वाचत रहा..

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...