विश्वजीत गंडले/घाटनांदूर: राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, याचा मोठा फटका मराठवाड्यातील ग्रामीण भागाला बसत आहे. अशीच विदारक आणि चिंताजनक स्थिती सध्या घाटनांदूर महसूल मंडळात निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतातील उभी पिके डोळ्यांदेखत करपून पार सुकून गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्याने स्थानिक बळीराजा प्रचंड आर्थिक संकटात आणि विवंचनेत सापडला आहे.
शेतातील करपलेल्या पिकांची आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या संकटाची गंभीर दखल घेत महसूल व कृषी विभागाच्या वतीने घाटनांदूर महसूल मंडळातील बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेत पंचनामे करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. पिकांचे झालेले अतोनात नुकसान प्रत्यक्ष पाहून शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. पावसाअभावी बियाणे, खते आणि मशागतीचा झालेला संपूर्ण खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हे पंचनामे केवळ शासकीय कागदावर न राहता प्रशासनाने ते तातडीने पूर्ण करावेत. तसेच शासनाने विलंब न लावता बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट दुष्काळी अनुदान आणि आर्थिक भरपाई जमा करावी, अशी आग्रही मागणी आता घाटनांदूर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमधून जोरदारपणे केली जात आहे.
यांनी केली पिकांची पाहणी
या पाहणी दौऱ्यावेळी कृषी सहाय्यक श्रीमती दिपाली मुंडे, तलाठी विठ्ठल पंडित, सरपंच महेश गारठे, तंटामुक्ती अध्यक्ष मुख्तार शेख, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी चव्हाण, वसंत कदम यांच्यासह पत्रकार संजय रानभरे, गणेश जाधव आणि उदय जाधव आदी मान्यवर प्रत्यक्ष शेतात उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शेतातील प्रत्येक पिकाच्या नुकसानीची नोंद घेण्याचे काम हाती घेतले आहे.
