विश्वजीत गडले / घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील मौजे घाटनांदूर ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि. २) विशेष ग्रामसभा गावच्या सरपंच महेश गारठे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या महत्त्वपूर्ण ग्रामसभेला गावातील सुजाण नागरिक, ज्येष्ठ व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
सभेच्या निर्धारित वेळेनंतर ग्रामस्थांची उपस्थिती वाढत जाऊन आवश्यक कोरम पूर्ण झाला; त्यानंतर सभेच्या कामकाजाला रीतसर सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना गावच्या विकासाचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सुरुवातीला मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सरपंचांनी गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात राबवण्यात आलेली विविध विकासकामे, शासकीय योजना, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व मूलभूत सुविधांचा सविस्तर लेखाजोखा मांडला. तसेच ग्रामपंचायतीला मिळालेला निधी आणि झालेल्या जमा-खर्चाची पारदर्शक माहिती ग्रामस्थांसमोर ठेवली.या सभेला ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध स्थानिक संस्थांचे पदाधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही ग्रामसभा शांततेत व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
नागरिक समस्यावर चर्चा
या ग्रामसभेदरम्यान गावातील प्रलंबित नागरी समस्या, अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि आगामी काळात करावयाची नियोजित विकासकामे यांवर उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. ग्रामस्थांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना व शंकांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. लोकशाही प्रक्रियेत ग्रामसभा हे गावाच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र असून पारदर्शक कारभार हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
