४ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त
गौतम बचुटे / केज:- युसुफ वडगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत दारूची चोरटी वाहतूक करणारी स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे. या कारवाईत दारूसह कार असा एकूण ४ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० ऑक्टोबर रोजी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संपत शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय कारले, गृहरक्षक दलाचे जवान पौळ आणि राऊत हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी परिसरात गस्त घालत होते. गस्त घालत असतानाच एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका स्विफ्ट कारमधून अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक केली जाणार आहे.ही माहिती मिळताच पोलीस पथकाने तत्काळ प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांना कल्पना दिली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि मांजरमे यांनी तात्काळ सापळा लावून कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस पथक केज-कळंब रोडवरील माळेगाव चौकात हजर झाले.रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास कळंबकडून केजच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-24/AB-0249 पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी इशारा करून कार थांबवली. कार चालक अजित अभिमन्यू सरवदे, वय ४६ वर्षे, रा. साबला, ता. केज याच्या ताब्यातील कारची पंचासमक्ष झडती घेतली असता,
कारची झाडझडती
कारची झाडझडती घेतली असता त्यात क्लासिक गोल्ड आणि टू बर्ग व्हिस्की कंपनीच्या एकूण ७१ बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत ११ हजार ८०० रुपये आहे.पोलिसांनी दारू आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ४ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धनंजय कारले यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संपत शेंडगे करीत आहेत.


