विश्वजीत गंडले/घाटनांदुर: घाटनांदूर परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी सरपंच महेश गारठे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आसरडोह तलावातील पाणीसाठा केवळ 30 ते 40 टक्के शिल्लक असून जानेवारीपर्यंतच पुरेल अशी परिस्थिती असताना, सरपंच गारठे यांनी नागरिकांना वाऱ्यावर न सोडता तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यांच्या या तत्परतेमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.घाटनांदूर शहराला 20 खेडी अंबळवाडी योजनेअंतर्गत (किसननगर तांडा) पाणीपुरवठा होतो. मात्र मुख्य पाईपलाईन नादुरुस्त असल्याने पाणी वाया जात होते. हे लक्षात येताच सरपंच महेश गारठे यांनी स्वतः पाईपलाईनची पाहणी केली. त्यांनी तात्काळ ग्रामपंचायतीची बैठक बोलावून पाईपलाईन दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून घेतला. पुढील 8 ते 10 दिवसांत संपूर्ण पाईपलाईनची डागडुजी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

नागरिकांसाठी अहोरात्र प्रयत्न

सरपंच गारठे हे केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देत आहेत. त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर 20 खेडी योजनेचे पाणी घाटनांदूरला लवकर मिळावे यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे.त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. “पाणी हे जीवन आहे, 8 ते 10 दिवसांच्या अंतराने होणाऱ्या पाणीपुरवठ्याला सहकार्य करा आणि काटकसरीने पाणी वापरा,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची ही समजूतदार भूमिका गावकऱ्यांना पटत आहे.

भविष्याची भक्कम तयारी

भविष्यात जर पाणीसाठा कमी पडलाच, तर गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरपंच गारठे यांनी आधीच प्लॅन तयार ठेवला आहे. शासकीय टँकर योजनेद्वारे तात्काळ पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी त्यांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत घाटनांदूरकरांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.गेल्या काही महिन्यांपासून सरपंच महेश गारठे यांच्या नेतृत्वाखाली घाटनांदूर ग्रामपंचायतीने अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पाणीप्रश्नावर त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि तत्परता यामुळे घाटनांदूरकरांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढला आहे.

गावकऱ्यांत समाधान

घाटनांदूर ग्रामपंचायतीच्या या कामाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सरपंच महेश गारठे यांनी वेळोवेळी गावाच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. भविष्यातही अशाच प्रकारे गावातील पाणी, रस्ते आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

व्हिडिओ बातमी खाली पहा –

व्हिडिओ बातमी

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.