अंबाजोगाई, दि. २१ (प्रतिनिधी): आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार कुटुंबातील महिलांना कौशल्य देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी अंबाजोगाईत एक स्तुत्य उपक्रम सुरू झाला आहे. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने महिलांसाठी विशेष शिवणकला प्रशिक्षण कार्यशाळा प्रकल्पाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४० महिलांनी सहभाग नोंदवत या संधीचे सोने करण्याची तयारी दर्शवली आहे.या संपूर्ण प्रकल्पामागे महिलांना फक्त शिवणकाम शिकवणे हा एकमेव उद्देश नाही, तर त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे हा व्यापक दृष्टिकोन आहे. आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे काळाची गरज आहे. घर सांभाळूनही त्या स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. हाच विचार घेऊन रोटरी क्लबने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

प्रशिक्षणाचा तपशील

ही कार्यशाळा २१ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२६ या आठवडाभर चालणार आहे. दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्रशिक्षण दिले जात आहे. अंबाजोगाईतील प्रसिद्ध अलिजा फॅशन, चौभारा गल्ली येथे हे प्रशिक्षण होत असून अनुभवी प्रशिक्षिका रफत नासेर काझी या स्वतः महिलांना प्रत्यक्ष मशीनवर प्रशिक्षण देत आहेत.रोटरी क्लबने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला संपूर्ण प्रशिक्षण किट मोफत देण्यात आले आहे. यामध्ये आवश्यक साहित्याचा समावेश असल्याने गरीब महिलांना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

उद्घाटन सोहळा उत्साहात

या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष शेख शकील बागवान, सचिव राधेश्याम लोहिया, प्रोजेक्ट चेअर कल्पना मुळावकर, वूमन एम्पॉवरमेंट चेअर स्वरूपा कुलकर्णी यांच्यासह राजेंद्र घोडके, मोईन शेख, संतोष मोहिते, सुरेश अरसुडे, अजित देशमुख, धनराज सोळंकी, बाळासाहेब कदम, रुपेश रामावत, अभिजीत बंडगर, रोटरॅक्टचे अध्यक्ष मयूर परदेशी आणि संदीप जाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष मोहिते यांनी केले.या उपक्रमामुळे नक्कीच ४० कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...