गौतम बचुटे/केज: पैशाच्या सततच्या तगाद्यामुळे आणि धमक्यांमुळे मानसिक तणावात असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरडेवाडी, ता. केज येथे घडली आहे. या प्रकरणी केज पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसात दाखल तक्रारीनुसार, मयत जयदीप बालासाहेब माळी (वय 25, रा. कोरडेवाडी) हे भिल्ल समाजाचे आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी गावातील एका व्यक्तीची कार नेली होती. परतीच्या प्रवासात त्या कारचा अपघात झाल्याने नुकसान झाले. यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने कार दुरुस्त करून देण्याचे ठरले होते. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, कार दुरुस्तीसाठी 35 हजार रुपये खर्च असताना संबंधित कार मालकाने शोरूममध्ये दुरुस्तीचा एक लाखापेक्षा जास्त खर्च सांगून पैशासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांची दुचाकी काढून घेणे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही आहे.

दुसऱ्या घटनेत, गावातीलच इतर दोघांनी ऊस तोड मजूर पुरवण्यासाठी जयदीप यांना यापूर्वी काही रक्कम दिली होती. मजुरांनी कामावर जाण्यास नकार दिल्याने त्या पैशाच्या परतफेडीसाठी त्यांच्यावर सतत दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असे तक्रारीत नमूद आहे.

या दोन्ही कारणांमुळे तणावात असलेल्या जयदीप यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांचे वडील बालासाहेब माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात दत्ता सिताराम यादव, जनार्धन नामदेव यादव आणि जयदीप उर्फ बंडू नामदेव यादव या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

[सूचना: ही बातमी आत्महत्येचे समर्थन करत नाही. कोणत्याही मानसिक तणावात असल्यास कृपया जवळच्या व्यक्तीशी बोला किंवा 1800-599-0019 या हेल्पलाईनवर संपर्क साधा]

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...