विश्वजीत गंडले/घाटनांदुर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लग्नसमारंभातील अवास्तव खर्चामुळे मेटाकुटीस आलेल्या मराठा समाजातील शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय जय भारती बहुउद्देश्यीय सेवाभावी प्रतिष्ठान, अंबाजोगाईने घेतला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने येत्या एप्रिल महिन्यात मराठा समाजातील वधू-वरांसाठी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा काळात मुलीच्या लग्नाचा खर्च पेलणे अनेक कुटुंबांना अशक्य होत आहे. हा सामाजिक प्रश्न लक्षात घेऊन लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत, रीतीरिवाजाप्रमाणे हा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी दिली. दरम्यान, जय भारती बहुउद्देश्यीय प्रतिष्ठानने आजपर्यंत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणे, तसेच पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदत पोहोचवण्याचे काम प्रतिष्ठान अविरतपणे करत आहे. त्याच सामाजिक बांधिलकीतून हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.

संसारासाठी आवश्यक वस्तू मिळणार

या सामुदायिक विवाहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वधू-वर जोडप्याला संसारासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू भेट स्वरूपात दिल्या जाणार आहेत. यामध्ये नव्या जोडप्यासाठी कपडे, मनी, मंगळसूत्र आणि संसार उपयोगी महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार पूर्णपणे हलका होणार आहे.ॲड. माधव जाधव यांनी आवाहन केले आहे.

नोंदणी करण्याचे आवहान

मराठा समाजातील ज्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुला-मुलींचे लग्न करायचे आहे, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपली नावे नोंदवावीत.

व्हिडिओ बातमी

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.