गौतम बचुटे/केज :– मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पाच हजाराची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्याचा गांधीगिरी पद्धतीने निषेध व्यक्त करण्यासाठी एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन विकून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी साजरी करण्यासाठी पाच हजार रु. आणि शेतकरी भावाकडून मुख्यमंत्रीच्या पत्नीला एक साडी भेट म्हणून पाठविली आहे.

या वर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पाच हजार रु ची मदत जाहीर केली आहे. मात्र महागाईच्या परिस्थितीत ही मदत अत्यंत तोकडी आहे. या अल्प मदतीत शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची? याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बीड जिल्ह्यातील वरपगाव ता. केज येथील अल्पभूधारक शेतकरी विजयकुमार खंदारे यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन विकून, दि. २२ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाच हजार रु. ची मनीऑर्डर पाठविली आहे. या पाच हजार रु. मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची दिवाळी साजरी करावी. मुलांना फटाके आणि फराळाचे साहित्य खरेदी करावे म्हणून ही पाच हजार रु. पाठविले आहेत. तसेच शेतकरी भावाच्या वतीने मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृताताई फडणवीस यांच्यासाठी एक साडीसुद्धा पाठविली आहे.
विजयकुमार खंदारे यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मदतीचा अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी केली असून जर शासन त्याचा विचार करीत नसेल तर अनेक शेतकरी ही मदत देखील स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे.

शेतकऱ्यांची थट्टा खर्च दुपटीने अन् उत्पन्न अर्ध्यावर :
मी अल्पभूधारख शेतकरी आहे चार एकर जमिनीत मला सोयाबीन पेरणी आणि काढणी पर्यंत सुमारे ४० हजार रु. खर्च आला परंतु यावर्षी पाऊस नसल्याने चार एकर मध्ये २० हजाराचे, अवघे तीन क्विंटल उत्पन्न मिळाले आहे. म्हणजे खर्च ४० हजार आणि उत्पन्न २० हजार असे झाले आहे.
—– विजयकुमार खंदारे (शेतकरी, वरपगाव)


Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...