अंबाजोगाई/प्रतिनिधी: सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. रोजच्या जेवणातील मुख्य घटक असलेल्या तांदूळ आणि डाळीच्या किमतीत गेल्या 15 दिवसात मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार तांदळाच्या किमतीत 10% तर तूरडाळीच्या किमतीत 13% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील बाजारात ही दरवाढ अधिक जाणवत आहे. यंदा मान्सून कमी झाल्याने आणि खरीप हंगामातील उत्पादन घटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवीन दर काय आहेत?
तांदूळ: सर्वसाधारण तांदूळ 46 ते 55 रुपये किलोवरून थेट 80 ते 85 रुपये किलोवर गेला आहे. बासमती तांदूळ 113 रुपयांवरून 135 रुपये किलो झाला आहे. कोलम 80 रुपये, इंद्रायणी 100 रुपये किलोने विकला जात आहे. तूरडाळ: गेल्या महिन्यात 126 रुपये असलेली तूरडाळ आता 143 ते 150 रुपये किलोवर पोहोचली आहे.उडीद डाळ: 120 रुपयांवरून 128 रुपये किलो मूग डाळ: 106 रुपयांवरून 112 रुपये तर किरकोळ बाजारात 120 रुपये किलो चना डाळ: 80 रुपयांवरून 90 ते 94 रुपये किलो
भाव का वाढले?
व्यापाऱ्यांच्या मते यामागे 3 मुख्य कारणे आहेत.
पावसाची तूट: देशात यंदा भात लागवडीचे क्षेत्र 449 लाख हेक्टरवरून 433 लाख हेक्टरवर आले आहे. म्हणजेच 3.5% ने घट झाली आहे. मराठवाड्यात 45 दिवस पावसाचा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले.आवक कमी: सणासुदीमुळे बेसन, फरसान, मिठाईची मागणी वाढली आहे, पण बाजारात मालाची आवक कमी आहे.आयातीवर अवलंबित्व: देशातील तुट भरून काढण्यासाठी म्यानमार आणि आफ्रिकन देशातून डाळ आयात करावी लागत आहे, त्यामुळे खर्च वाढला आहे.
सरकार काय करणार?
केंद्र सरकारकडे सध्या 38 दशलक्ष टनांपेक्षा जास्त तांदळाचा साठा आहे, जो गरजेपेक्षा तिप्पट आहे. हा साठा लवकरच खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (OMSS) स्वस्त दरात विकला जाणार आहे. तसेच रेशन दुकानावर 1 किलो तूरडाळ 30 रुपयांत देण्याची योजना सुरू ठेवण्यात आली आहे.
