अंबाजोगाई: बालवयातच श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबन ही शिकवण भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने नेहमीच दिली आहे. सध्या ग्रामीण भागात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त काहीतरी भरीव करता येईल का? या संकल्पनेतून एक आगळा-वेगळा उपक्रम पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात राबविण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत शाळेतील २५ विद्यार्थिनींनी एकत्र येत दिवाळी सणासाठी ‘अमृत सुगंधी उटणे’ तयार केले आहे. हे उटणे १०० टक्के आयुर्वेदिक असून पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनविण्यात आले आहे.दुष्काळामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली असताना या मुलींनी केवळ हातावर हात ठेवून न बसता स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलण्याचा निर्धार केला आहे. या उटण्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या आपल्या शैक्षणिक साहित्याचा आणि शिक्षणाचा खर्च भागवणार आहेत. या उपक्रमासाठी केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. कल्पनाताई चौसाळकर, शालेय समितीचे अध्यक्ष आप्पाराव यादव यांचे मार्गदर्शन लाभले. पोखरीच्या या लेकींचा हा उपक्रम संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

असे आहे ‘अमृत सुगंधी उटणे’

बाजारातील रासायनिक उटण्यांना फाटा देत, या मुलींनी तयार केलेले उटणे हे आयुर्वेदिक पद्धतीने बनवले आहे. यात नागरमोथा, कापूरकचरी, हळद, बावची, ब्राम्ही, कचोरा, मुलतान माती यांचे मऊ मिश्रण करून सुगंधी उटणे तयार केले आहे.याचे वजन २० ग्रॅम असून किंमत केवळ २० रुपये ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशी किंमत ठेवून अशा ५ हजार ५०० आकर्षक पॉकेट मुलींनी मोठ्या परिश्रमाने तयार केल्या आहेत.

प्रशिक्षण आणि मार्गदर्शन

या विद्यार्थिनींना या कामाचे विशेष प्रशिक्षण शाळेचे मुख्याध्यापक विवेक जोशी, कला शिक्षक राकेश मोरे आणि लिपिक आनंद गणोरकर यांनी दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी उटणे बनविण्याची कृती, त्याचे प्रमाण, पॅकिंग आणि विक्री व्यवस्थापनाचे धडे गिरवले.भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर प्रत्यक्ष जीवनात स्वावलंबी कसे व्हावे याचे धडे मिळाले आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...