घाटनांदुर/प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर शिवारातील शेत गट क्रमांक ६२० मध्ये सोयाबीनचा ढिग पेटवून नुकसान केल्याची तसेच महिला शेतकऱ्यास बाभळीच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिर व जाऊविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
फिर्यादी सुनिता अशोक क्षीरसागर (वय ५५, रा. बर्दापूर) या शेतात असताना त्यांचे दिर बसवेश्वर नागनाथ क्षीरसागर आणि जाऊ शितल बसवेश्वर क्षीरसागर यांनी संगनमत करून वाद घातला. तुझ्या सोयाबीनचा ढिग पेटवून देतो असे म्हणून आरोपींनी सोयाबीनच्या गुळीचा ढिग पेटवून दिला. यामुळे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादीने विरोध केला असता केस धरून बाभळीच्या काठीने पाठीवर, हातावर व पायावर मारहाण केली तसेच छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेतात परत यायचे नाही, गावात राहिलात तर जिवंत मारून टाकू अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोह चेवले हे करत आहेत.
