विश्वजीत गंडले/घाटनांदुर : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर शिवारात शेतात काढून ठेवलेल्या १९ पोती सोयाबीनवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. 30 रोजी पहाटे घडली. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश बद्रीनारायण बालदी (वय ३२ वर्षे, व्यवसाय शेती, राहणार बर्दापूर) यांनी त्यांच्या शेतात सोयाबीनची काढणी आणि मळणी केली होती. मळणी केल्यानंतर मजूर मिळत नसल्याने आणि वाहनाची व्यवस्था न झाल्याने त्यांनी १९ पोती सोयाबीन शेत गट क्रमांक ५५७ मधील शेतातच सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवले होते. दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २ ते ४ वाजेच्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शेतात घुसून ठेवलेली सर्व १९ पोती सोयाबीन चोरून नेली. सकाळी शेतात गेल्यानंतर पोती गायब असल्याचे दिसताच बालदी यांनी आरडाओरड केली आणि तात्काळ बर्दापूर पोलिसांना माहिती दिली. या चोरीमुळे शेतकऱ्याचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास चोरट्यांनी हिरावून घेतल्याने शेतकरी वर्गात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरट्यांचा सोयाबीनवर डोळा
सध्या सोयाबीनला चांगला भाव असल्याने चोरट्यांचे शेतमालावर डोळे आहेत का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेवले हे करत आहेत. रात्रीच्या वेळी शिवारात गस्त वाढवावी, अशी मागणी बर्दापूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
