गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. विलास भागवत बन (वय ४६, रा. कळंब, धाराशिव) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

विलास बन याचे शिक्षण केवळ निसर्गोपचार, योगा आणि अक्युपंक्चर या पॅरामेडिकल शाखेत झाले आहे. मात्र त्याने चलाखीने इंग्रजी अक्षरांची हेराफेरी करून स्वतःला BMS (आयुर्वेद पदवीधर) डॉक्टर असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले होते. बोरगाव येथे हनुमान मंदिरासमोर एका माळवदाच्या गाळ्यात तो गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे रुग्णांवर उपचार करत होता.

कशी झाली कारवाई?

या बोगस डॉक्टरबद्दल एका सुज्ञ नागरिकाने १२ ऑक्टोबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने त्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले.त्यानंतर गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे, आरोग्य विस्तार अधिकारी छाया जाधव, पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गोरख फड आणि बाजीराव दराडे यांनी बोरगाव येथे छापा टाकला. त्यावेळी तो एका महिला रुग्णावर उपचार करताना आढळला. त्याच्याकडे कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना नव्हता.पथकाने त्याच्या दवाखान्यातून बेकायदेशीर औषधसाठा जप्त केला आहे.

गुन्हा दाखल

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि वैद्यकीय व्यावसायिक कायदा तसेच औषधी द्रव्य कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर करत आहेत.या कारवाईनंतर तालुक्यातील इतर बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी आपले दवाखाने बंद केल्याची चर्चा आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...