अंबाजोगाई: यंदाचा पावसाळा अंबाजोगाई तालुक्यासाठी निराशाजनक ठरला आहे. मान्सूनने सुरुवातीला हजेरी लावली असली तरी नंतर पूर्णपणे दांडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी भूजल पातळी प्रचंड खाली गेली असून शेतीच्या विहिरींनी आता तळ गाठला आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांनी साथ सोडली आहे. त्यामुळे केवळ शेतीच नाही तर पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावात टँकरची मागणी वाढू लागली आहे. तालुक्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन यंदा शेतकऱ्यांच्या हातातून पूर्णपणे गेले आहे. पिकाला दाणा भरण्याच्या आणि काढणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवली. परिणामी शेतातील उभं पीक जागेवरच करपून गेलं.
उत्पन्न मिळण्याची शक्यता संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी हताश होऊन करपलेलं सोयाबीन उपटून टाकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

रब्बी पेरणीवर प्रश्नचिन्ह

खरीप हातचा गेला असतानाच आता रब्बी हंगामावरही मोठं संकट घोंघावत आहे. विहिरींमध्ये पाणीच शिल्लक नसल्याने हरभरा आणि गहू पिकांची पेरणी कशी करायची? हा मोठा प्रश्न बळीराजासमोर आहे. पाण्याअभावी रब्बीच्या आशाही आता मावळू लागल्या आहेत.

तातडीने पंचनामे करा – शेतकऱ्यांची मागणी

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ शेतात जाऊन सोयाबीनच्या नुकसानीचे आणि विहिरींच्या पाणी पातळीचे पंचनामे करावेत. तसेच दुष्काळी उपाययोजना लागू करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...