विश्वजीत गंडले / घाटनांदूर:
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे इतिहासात पहिल्यांदाच देहदानाची नोंद झाली आहे. येथील रहिवासी गोदावरीबाई दगडू जाधव (वय ६५ वर्षे) यांचे रविवारी (दि. ४) सायंकाळच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर जाधव कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत एक ऐतिहासिक आणि आदर्शवत निर्णय घेतला. त्यांनी गोदावरीबाईंचे पार्थिव वैद्यकीय संशोधनासाठी देहदान करण्याचा संकल्प पूर्ण केला.
गोदावरीबाई जाधव या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. मृत्यूनंतरच्या पारंपरिक रुढी-परंपरांना फाटा देत, समाजातील भावी डॉक्टरांच्या अभ्यासासाठी आणि वैद्यकीय संशोधनाला हातभार लागावा या उदात्त हेतूने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला.
गावाच्या इतिहासातील हे पहिलेवहिले देहदान ठरले असून, या दातृत्वामुळे परिसरात जाधव परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निर्णयामुळे समाजात अवयवदान आणि देहदानाबाबत एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
