विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील पुस गावात रात्रीच्या जेवणानंतर एकाच वेळी 11 जणांना त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने या सर्वांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, अंबाजोगाई येथे दाखल करावे लागले.
प्राथमिक माहितीनुसार, पुस येथील कचरे कुटुंबीयांच्या घरी पाहुणे आले होते. बाजारातून आणलेल्या वांग्यापासून रात्री भाजी बनवण्यात आली होती. सुमारे 9 वाजता जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात घरातील लहान-मोठ्यांना अस्वस्थ वाटू लागले.कुटुंबीयांनी तात्काळ सर्वांना अंबाजोगाईकडे नेले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सर्व 11 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमागे वांग्यावरील कीटकनाशक फवारणी आहे का, की अन्य काही कारण आहे, हे तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. आरोग्य विभागाकडून वांग्याचे नमुने घेण्यात येणार आहेत.पुसच्या प्रसिद्ध वांग्याच्या भाजीच्या या घटनेमुळे गावात सध्या चर्चेला उधाण आले आहे.
औषध फवारणीमुळे विषबाधा?
वांग्यांवर औषध फवारणी झाली होती का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वांग्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असून अहवालानंतरच खरे कारण समजेल.
बाधितांची नावे
कुसुम कचरे, रसिका कचरे, श्रेयस कचरे, श्रेया कचरे, त्र्यंबक कचरे, स्वप्निल कचरे, ईश्वर कचरे, सुनंदा आगरकर, श्रेया आगरकर, आशा आरसुडे, अनन्या आरसुडे.
