अंबाजोगाई/प्रतिनिधी: घराच्या दारात बसून दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून दोन तरुणांनी एका मजूर दांपत्यासह त्यांच्या दिराला काठी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील वानटाकळी येथे घडली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. वानटाकळी येथील रहिवासी सुमन सोमनाथ पांचाळ (वय 31, मजुरी) यांच्या घराच्या दारासमोर आरोपी दारू पीत बसले होते आणि मोठ्याने आरडाओरडा करत होते.त्यावेळी सुमन पांचाळ यांनी “आमच्या दारात दारू पिऊ नका” असे म्हटले असता, आरोपींनी “तू आम्हाला सांगणारी कोण? हा तुझ्या बापाचा रस्ता आहे का?” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.यानंतर आरोपींनी जवळच पडलेली काठी आणि दगड उचलून सुमन पांचाळ, त्यांचे पती सोमनाथ पांचाळ आणि दिर महादेव पांचाळ यांना मारहाण करून जखमी केले. जखमींवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुन्हा दाखल
या प्रकरणी सुमन पांचाळ यांच्या फिर्यादीवरून बालाजी भागवत हांगे, सदाशिव मुक्ताराम काशिंदे (दोघे रा. वानटाकळी) अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 386/26 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार बासर हे करत आहेत.
