सदानंद वालेकर / आंबेजोगाई: यंदा पावसाने पूर्णपणे दगा दिल्याने आंबेजोगाई तालुक्यासह संपूर्ण परिसरातील खरीप हंगामातील मुख्य नगदी पीक असलेले सोयाबीन पूर्णपणे वाया गेले आहे. ऐन फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या काळात पावसाने खंड दिल्याने शेतात उभे असलेले सोयाबीन जळून गेले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा पुरता कोलमडला आहे.
शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात मदत कधी मिळणार याची शाश्वती नाही. विमा कंपनीचे पंचनामे आणि सरकारी फाईल्समध्ये शेतकरी अडकला आहे. पण या संकटातही आंबेजोगाईचा शेतकरी खचला नाही, तो पुन्हा रब्बीच्या आशेने शेतात उतरला आहे.
मराठवाड्यात सध्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. विहिरींनी तळ गाठला असून आहे ती जनावरे जगवायची कशी, हा प्रश्न आहे. त्यातच शेतमजूर मिळणेही कठीण झाल्याने शेतीची कामे वेळेत होत नाहीत. यंदा सोयाबीनची स्थिती अत्यंत विदारक आहे. अनेक ठिकाणी शेंगाच लागली नाही. त्यामुळे पीक काढून बाहेर टाकण्यासाठीच एकरी ३ ते ४ हजार रुपये खर्च करावा लागत आहे. म्हणजे उत्पन्न नाही आणि उलट खर्चच! तरीही बळीराजा थांबला नाही. उपलब्ध असलेल्या अल्प पाण्याचा काटकसरीने वापर करत तुषार सिंचनाने रब्बीची मशागत सुरू आहे. सकाळी-संध्याकाळी शेतकरी पाईपलाईन जोडून शेत ओलवताना दिसत आहे. हरभरा, ज्वारी, गहू या पिकांवरच आता सर्व आशा टिकून आहे.
