विश्वजीत गंडले/घाटनांदुर:
अंबाजोगाई येथून अहमदपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर तळणी येथे मुख्य रस्त्यावर टाकण्यात आलेले अनधिकृत गतिरोधक अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देणारे ठरत आहेत. शास्त्रीय नियमांना धाब्यावर बसवून तयार करण्यात आलेल्या या धोकादायक गतिरोधकांमुळे येथे अपघातांची मालिकाच सुरू झाली असून, निष्पाप प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
या महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. अनेक दुचाकीस्वार उडून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले असून, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.दोनच दिवसांपूर्वी धर्मापुरी येथील एक दाम्पत्य दुचाकीवरून जात असताना या गतिरोधकावर जोरदार अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
वाहनधारकांचा प्रशासनाला सवाल
जीवघेणे ठरणारे हे अनधिकृत गतिरोधक हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोणाच्या बळीची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे धोकादायक गतिरोधक तात्काळ हटवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त वाहनधारकांनी दिला आहे.
या अनधिकृत गतिरोधकांबाबत भारतीय रस्ते काँग्रेस (IRC) च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे. नियमांनुसार गतिरोधकाची उंची 10 ते 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी आणि त्यावर पांढरे पट्टे, तसेच 50 मीटर आधीपासून सूचना फलक असणे बंधनकारक आहे. मात्र तळणी येथील गतिरोधक हे थेट 15 ते 18 सेंटीमीटर उंचीचे असून त्यावर कोणतेही मार्किंग किंवा रेडियम नाही. रात्रीच्या वेळी तर ते अजिबात दिसत नाहीत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या गतिरोधकांची पाहणी करून शास्त्रीय पद्धतीने नव्याने गतिरोधक बसवावेत, किंवा हे धोकादायक गतिरोधक तात्काळ हटवावेत अशी मागणी होत आहे. जर येत्या आठ दिवसात प्रशासनाने कारवाई केली नाही तर तळणी ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा वाहनधारकांनी दिला आहे. प्रशासन आता यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
