गौतम बचुटे /केज: केज तालुक्यातील बोबडेवाडी गावातून एक धक्कादायक आणि भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे. या गावात सार्वजनिक स्मशानभूमीचे अस्तित्वच नसताना ती असल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाच्या जनसुविधा योजनेंतर्गत तब्बल 11 लाख रुपयांचा सिमेंट रस्ता मंजूर करून त्याचे बांधकाम केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी माजी सरपंचांनी केली आहे.
बोबडेवाडीचे माजी सरपंच संतोष क्षिरसागर यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावात प्रत्यक्षात कोठेही सार्वजनिक स्मशानभूमी नाही. असे असतानाही काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्मशानभूमी असल्याचे भासवले आणि जनसुविधा योजनेतून 11 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. विशेष म्हणजे हा रस्ता अत्यंत घाईगडबडीत आणि रात्रीच्या अंधारात पूर्ण करण्यात आला आहे, जेणेकरून गावकऱ्यांना याची माहिती होऊ नये.
पुरावे सादर करण्याची मागणी
या प्रकरणातील सत्यता पडताळण्यासाठी क्षिरसागर यांनी त्या कथित स्मशानभूमीचा पीटीआर उतारा, जमिनीचे लोकेशन आणि प्रत्यक्ष जागेचे फोटो पुरावे म्हणून सादर करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार केज, गटविकास अधिकारी केज आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे देखील दिल्या आहेत. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या कामाचे बिल अदा करू नये, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण केज तालुक्यात खळबळ उडाली असून शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
