गौतम बचुटे/केज: – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शेतात आग लागून शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका घटनेत केज येथील शेतकऱ्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावली तर दुसऱ्या घटनेत विजेच्या तारांचा एकमेकांना घर्षण झाल्याने ठिणगी पडून शेतकऱ्याचा ऊस जळाला आहे. या दोन्ही घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पहिली घटना केज शहरालगत घडली आहे. केज येथील प्रगतशील शेतकरी शफीक महेमूद यांची केज येथून जाणाऱ्या जुन्या टाकळी रस्त्यालगत दोन एकर शेती आहे. त्यांनी यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे पीक घेतले होते. कापणी पूर्ण करून त्यांनी मळणीसाठी शेतातच सोयाबीनची गंज लावून ठेवली होती. दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावून दिली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि कापून ठेवलेले संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेले पीक जळाल्याने शफीक महेमूद यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.

दुसरी घटना मांगवडगांव येथील आहे. मांगवडगांव येथील शेतकरी अमोल उत्तरेश्वर जाधवर यांच्या मालकीचा गट नं. १३३ मध्ये एक एकर ऊस आहे. हा ऊस तोडणीला आला होता. दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांच्या उसाच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या खांबावरील वीजवाहक तारा सैल झाल्याने लोंबकळत होत्या. वाऱ्यामुळे या तारांचे एकमेकींना घर्षण होऊन स्पार्किंग झाले आणि ठिणगी थेट उसाच्या शेतात पडली. क्षणातच एक एकर ऊस जळून खाक झाला. यापूर्वीही नायगाव येथे अशाच प्रकारे सहा एकर ऊस जळाला होता.

दरम्यान, केज तालुक्यात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वारंवार जळीताच्या घटना घडत असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दोन्ही घटनांचा महसूल विभाग आणि महावितरणने तात्काळ पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...