गौतम बचुटे/केज:– बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. केज येथील आठवडी बाजारात दुष्काळाच्या झळा जाणवतात प्रचंड प्रमाणात जनावरांची आवक वाढलेले असून पशुधन विक्री करीत असताना शेतकर्याच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. मात्र पशुधनाचे भाव प्रचंड खाली आले आहेत.

यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे चारा-पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न पशुपालकांपुढे उभा राहिला आहे. परिणामी, पशुधन कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकरी आणि पशुपालकावर आली आहे. साळेगाव ता. केज येथील बाजारात पशुधन विक्रीसाठी आलेल्या पशुपालक-शेतकऱ्यांची गर्दी गुरुवारी दिसून आली. दर गुरुवारी मराठवाड्यातील सर्वात मोठा गुरांचा आठवडी बाजार भरत असलेल्या साळेगाव ता. केज येथे भरतो. त्यामुळे पशुधन खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी बीड जिल्ह्यासह शेजारच्या धाराशिव, लातूर, सोलापूर जिल्ह्यांतून पशुपालक व व्यापारी मोठ्या प्रमाणावर येतात. या बाजारात दर बाजारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बाजारात देशी व गावरान बैल-गायी, जर्सी बैल-गायी, म्हशीसह विविध जातींचे बैल विक्रीसाठी येतात. ऊसतोड मजुरांचे साखर कारखान्यांकडे स्थलांतर होण्यापूर्वी बैल खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. मात्र सध्या अनेक ऊसतोड मजूर साखर कारखान्यांकडे स्थलांतरित झाले आहेत. ऊसतोड मजूर साखर कारखान्यांकडे जात असतानाही या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर बैल विक्रीला आल्याचे चित्र दिसून आले. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे. खरिपाची पिके हातातून गेली आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. साठवण तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी-बोअरच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. भविष्यात माणसांना पिण्याचे पाणी मिळेल की नाही ? असा प्रश्न आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून? हा प्रश्न शेतकरी-पशुपालकांपुढे उभा आहे. शेतातून चारा उपलब्ध झाला नाही. दुसरीकडे चाऱ्याचाही प्रश्न भेडसावत आहे. अशा परिस्थितीत पशुधन जतन कसे करायचे? या विचारातून बैलजोडीसह पशुधनाला बाजार दाखविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चारा-पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे पशुधन कवडीमोल भावाने विकण्याची वेळ पशुपालक-शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे गुरुवारी भरलेल्या आठवडी बाजारात विक्रीसाठी बैल-गायी, म्हशींची संख्या मोठी होती. गुरे खरेदीला आलेले पशुपालक मोजकेच होते. कसायाच्या दावणीला पशुधन बांधण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शासनाने गुरांच्या चारा-पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

…पण कसायाला देणार नाही

कमी भाव आला तरी कसायला जनावर विकणार नाही असे शेतकऱ्याची भावना असून घरातील जनावर विकल्यास अनेक शेतकऱ्यांचे डोळे ओले होत आहेत.

छावणी ऐवजी दावणीला चारा पाणी द्या

चारा छावण्यात लाळ्या खुरकूत, लंपी, फऱ्या, घट सर्प असे संसर्गजन्य आजार होतात त्यामुळे शासनाने छावणी ऐवजी दावणीला चारा पाणी देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

जनावरांच्या भावांमध्ये मोठी घट

शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जनावरे सांभाळली आहेत. पण दुष्काळामुळे जनावरांना टाकायला चारा नाही. पाजण्यासाठी पाणी नाही. म्हणून जनावरे विक्रीला शेतकरी घेऊन येत आहेत. जनावरे विक्रीला घेऊन येताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रु आणि सौदा करताना कंठ दाटून येत आहे. सध्या दुष्काळामुळेजनावरांच्या भावांमध्ये ४० ते ५० टक्क्याने घट झाली आहे.
—— कैलास पाटील, सरपंच

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...