गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात महावितरणच्या हलगर्जीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यातील नायगाव येथे लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांच्या घर्षणातून निघालेल्या ठिणगीने सहा एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत तीन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ठिबक सिंचन संच देखील जळून गेले आहेत.

केज तालुक्यातील नायगाव येथे दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गावातील विजेच्या खांबावरील वीज वाहक तारा लोंबकळत होत्या. वाऱ्यामुळे या तारांचे एकमेकांशी घर्षण होऊन ठिणगी खाली पडली आणि तोडणीला आलेल्या उसाच्या शेताने पेट घेतला. या आगीत महारुद्र सखाहरी गुजर, नितीन श्रीहरी गुजर आणि सचिन नवनाथ गुजर या तीन शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकर ऊस जळून खाक झाला आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेतात टाकलेला ठिबक संचही पूर्णपणे जळून गेला आहे. ऐन दुष्काळात हाताशी आलेले पीक डोळ्यादेखत जळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महावितरणने वेळीच लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त केल्या असत्या तर हे नुकसान टळले असते, असा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे

नुकसान भरपाईची मागणी

या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ही आग लागली असून, ज्या तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...