अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई शहरात हॉटेलच्या थकीत बिलावरून झालेल्या वादातून एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केज-बीड रोडवरील प्रसिद्ध महाराजा हॉटेलमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय प्रकाश गायकवाड (वय २७, रा. शिक्षक कॉलनी, अंबाजोगाई) हे महाराजा हॉटेलचे चालक आहेत. दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी अभय सावरे (रा. चनई, ता. अंबाजोगाई) हा हॉटेलमध्ये आला होता.यावेळी अक्षय गायकवाड यांनी त्याच्याकडे मागील जेवणाचे थकीत बिल मागितले. तू मला मागील बिल कसे मागितले? असा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर शिवीगाळात झाले आणि रागाच्या भरात आरोपीने बाजूला पडलेली वीट उचलून अक्षय गायकवाड यांच्या डोक्यात मारली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण करण्यात आली.जिवे मारण्याची धमकी आणि तोडफोड
मारहाणीवरच न थांबता आरोपीने पुन्हा बिल मागितलेस तर जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली.
एवढेच नव्हे तर हॉटेलसमोर उभी असलेली फिर्यादीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 44 AA 4564) आणि हॉटेलमधील फ्रीजवर दगड मारून मोठी तोडफोड व नुकसान केले.या घटनेनंतर जखमी हॉटेल चालक अक्षय गायकवाड यांनी तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अभय सावरे याच्या विरुद्ध गु.र.नं. ४७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाचपिंडे या करत आहेत.
