विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करून प्रहार संघटनेच्या नूतन शाखेची स्थापना करण्यात आली.

बीड जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांच्या हस्ते संघटनेचा झेंडा फडकावून या शाखेचे थाटात स्थापना करण्यात आली. यावेळी पर्यावरणाचे रक्षण हाच खरा विकास आहे, असा संदेश देत पिंपळाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. या झाडाच्या संवर्धनाची जबाबदारी उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतली.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे म्हणाले की, प्रहार प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रहार संघटना सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. घाटनांदूरसारख्या ग्रामीण भागात संघटनेची शाखा सुरू झाल्यामुळे आता स्थानिक प्रश्नांना वाचा फुटेल. विशेषतः दिव्यांग बांधवांना घरकुल, शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रहार संघटना आक्रमकपणे काम करेल.या कार्यक्रमास प्रहारचे तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाखेची स्थापना

यावेळी घाटनांदूर शाखेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी जावेद शेख, उपाध्यक्षपदी बालाजी शिंदे, तर सचिवपदी अन्वर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणीमध्ये अन्य सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

घरकुलाचा प्रश्न मार्गी लावणार

नवनियुक्त अध्यक्ष जावेद शेख यांनी सांगितले की, बच्चू कडू साहेबांच्या विचारांवर आम्ही काम करणार असून, घाटनांदूर परिसरातील गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. आगामी काळात दिव्यांग बांधवांच्या घरकुलाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.