गौतम बचुटे/केज: केज शहरातील क्रांतीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी येडबा शिनगारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शिर्डी येथील ‘बी दी चेंज फाऊंडेशन’ तर्फे हा अत्यंत मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.संभाजी शिनगारे हे गेल्या एक वर्षापासून क्रांतीनगर शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या या यशाबद्दल ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दत्ता धस, नवनाथ धिवार, संजय शिनगारे, सहकारी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
या कार्याची घेतली दखल
विद्यादानासोबतच प्रशासकीय कामातही त्यांचा हातखंडा आहे. गायन, वक्तृत्व आणि क्रीडा क्षेत्रातही ते पारंगत आहेत. तळागाळातील आणि उपेक्षित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत असतात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक आणि सहशालेय कार्यातील निष्ठा आणि समर्पण भावना लक्षात घेऊन फाऊंडेशनने त्यांची २०२६ च्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली.
