गौतम बचुटे/केज: अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची यादी बनसारोळा येथील IDBI बँकेने प्रसिद्ध न केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते रमेशराव आडसकर यांनी थेट बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.

राज्य सरकारने पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ही कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मात्र बनसारोळा शाखेने पात्र शेतकऱ्यांची यादीच लावली नाही. त्यामुळे शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी रमेश आडसकर यांच्याकडे तक्रार केली.तक्रारीनंतर आडसकर यांनी 28 ऑक्टोबर रोजी बनसारोळा, आवसगाव, बोरीसावरगाव, कौडगाव, औरंगपूर आणि इस्थळ येथील शेतकऱ्यांसह बँक प्रशासनाची भेट घेतली. त्यांनी 2 नोव्हेंबर पर्यंत यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली. यादी न लागल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.

मंत्र्यांशी फोन वरून चर्चा

या प्रकरणी आडसकर यांनी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बँक प्रशासनाला तातडीने सूचना देण्याची विनंती त्यांनी केली.दरम्यान, बँक प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच यादी प्रसिद्ध करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची आशा आहे.

ही बातमी ही वाचा ..

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...