गौतम बचुटे/केज:
केज-अंबाजोगाई रस्त्यावरील कुंभेफळ शिवारात काल रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला भरधाव फोर-व्हीलर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुंभेफळ शिवारात उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्त्याने जात होता. त्याच वेळी पाठीमागून येणारी होंडा कंपनीची फोर-व्हीलर कार (क्र. MH.44.G.3060) ने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, फोर-व्हीलर कारचा पुढील भाग आणि डाव्या बाजूचा दरवाजा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तर धडकेमुळे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्यावरच पलटी झाली असून ऊस रस्त्यावर विखुरला गेला.
दोन जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
या अपघातात फोर-व्हीलरमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढून तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरला मागे रेडियम किंवा लाईट नसल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
रात्रीच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन
केज-अंबाजोगाई रस्त्यावर रात्रीच्या वेळी उसाचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात. अनेक ट्रॅक्टरला मागे इंडिकेटर किंवा रिफ्लेक्टर नसतो, त्यामुळे असे अपघात वाढले आहेत. वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
