अंबाजोगाई/ प्रतिनिधी : अंबाजोगाई तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील नदीचे अनेक वर्षांपासून खोलीकरण न झाल्याने या भागातील पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी नदीचे खोलीकरण व कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष (चर्मकार सेल) ॲड. शिवाजी कांबळे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सोमनाथ बोरगाव गावालगत वाहणाऱ्या नदीचे खोलीकरण केल्यास सोमनाथ बोरगाव, माकेगाव, हिवरा या परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. त्यामुळे नदी खोलीकरण व बंधारा दुरुस्ती झाल्यास संपूर्ण भागाचा भविष्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे. याबाबत अंबाजोगाईचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जलसंधारण विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
बंधारे नादुरुस्त
या नदीलगत असलेले दोन कोल्हापुरी बंधारे सध्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. हे बंधारे दुरुस्त केल्यास पाणी साठवण क्षमता वाढेल. डिघोळ आंबा शिवारातील साठवण तलावावर दहा ते बारा गावांच्या पिण्याच्या पाण्याची ग्रामपंचायत विहीर अवलंबून आहे.
