डी. सदानंद/अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरात अतिक्रमण हटविण्याच्या बहुप्रतिक्षित मोहिमेला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे मोठे पाऊल उचलले आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शासकीय स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे अतिक्रमण एकाच वेळी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
या कारवाईसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, तसेच जेसीबी, ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्री सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू झाली. रस्त्याच्या कडेला असलेले वाळू, खडीचे अनधिकृत ढीग, पत्र्याच्या टपऱ्या, हातगाड्या आणि दुकानांसमोरचे वाढीव शेड या कारवाईत हटविण्यात येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
या धडक कारवाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला असून, चौक आता पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे. रस्ता रुंद आणि मोकळा झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि रस्ते अपघातमुक्त व्हावेत, या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, ही कारवाई केवळ याच रस्त्यापुरती मर्यादित न राहता शहरातील इतर प्रमुख रस्ते आणि चौकांमध्येही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची ही मोहीम पुढेही अशीच सुरू राहणार का, याकडे संपूर्ण अंबाजोगाईकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
