अंबाजोगाई/प्रतिनिधी :
अंबाजोगाई शहरात सध्या आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जाणाऱ्या सेंधा व काळा नमकच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर एका फिरत्या वाहनावर हा अनोखा स्टॉल उभारण्यात आला आहे. नागरिकांना अस्सल आणि नैसर्गिक सैंधव मीठ थेट उपलब्ध करून देणे हा या विक्रीचा मुख्य उद्देश आहे.
या फिरत्या गाडीवर पांढऱ्या आणि काळ्या मिठाचे मोठे अस्सल खडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गाडीवर लावलेल्या पिवळ्या फलकावर या मिठाचे फायदे सविस्तरपणे लिहिण्यात आले आहेत. फलकावर बी.पी., पथरी, गॅस आणि इतर आजारांवर हे मीठ लाभदायक असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष आपोआप या गाडीकडे वेधले जात आहे.
आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत लोकांचा कल पुन्हा एकदा पारंपरिक आणि नैसर्गिक आहाराकडे वळला आहे. रासायनिकयुक्त मीठाऐवजी सैंधव मीठाला मागणी वाढली आहे. आयुर्वेदात देखील सेंधा मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपवास, व्रत आणि रोजच्या आहारात याचा वापर केला जातो. हे मीठ पचायला हलके असून शरीरासाठी थंड गुणधर्माचे मानले जाते.अंबाजोगाई शहरात सुरू असलेल्या या आरोग्यवर्धक मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक आवर्जून थांबून या मिठाची माहिती घेत आहेत आणि खरेदी करत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात अशा पारंपरिक घटकांची सहज उपलब्धता होत असल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहेत.
अनेक रोगावर गुणकारी
विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, हे सेंधा व काळा नमक पोटदुखी, अपचन, अॅसिडीटी आणि पोटातील गॅसच्या समस्येवर अत्यंत गुणकारी आहे. उच्च रक्तदाब आणि ताणतणाव असलेल्या रुग्णांसाठी देखील हे फायदेशीर आहे. रोजच्या जेवणात आमटी, डाळ, ताक, सॅलड, फळ-फ्रुट आणि रायत्यामध्ये याचा वापर केल्यास अन्नाची चव तर वाढतेच, पण आरोग्यही सुधारते.
