गौतम बचुटे/केज:– गोवंशीय जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणारे पिकअप केज पोलिसांनी पकडून गोवंशाची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास एक पिकअप वाहन तीन बैल, एक गाय आणि दोन कालवडी असे एकूण सहा गोवंशीय जनावरे भरून अंबाजोगाई रस्त्याने जात असल्याची गोपनीय माहिती केज पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच केज पोलिसांनी केज-अंबाजोगाई रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालया समोर सापळा लावला. त्यावेळी संशयित पिकअप क्र. एमएच-५५/ सी-०२३२ ला अडवून त्याची झडती घेतली असता, पिकअपमध्ये गोवंशीय जनावरे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी क्रूर व निर्दयीपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कोंबून भरल्याचे आढळून आले.या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रकाश मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरांचा मालक सलमान मेहबूब शेख (रा. वाढवणा ता. उदगीर जि. लातूर) आणि पिकअप चालक रमेश बापूराव चव्हाण (रा. डोंगर कोन्हाळी ता. जळकोट जि. लातूर) या दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६८४/२०२६, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(डी), १२(१)(इ) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल संगीता हनवते या करीत आहेत.
६ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ७० हजार रुपयांचा एक बैल, ५५ हजार रुपयांची एक जर्सी गाय, ६० हजार रुपयांची एक संकरित गाय, ७० हजार रुपयांचा एक जर्सी बैल, ४५ हजार रुपयांच्या दोन जर्सी कालवडी आणि ३ लाख ५० हजार रुपयांचे पिकअप वाहन असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
