विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ: परळी तालुक्यातील पांगरी येथून 48 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुठेही शोध न लागल्याने अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी मिरा बापू रोडे( वय 42 वर्षे, राहणार पांगरी तालुका परळी जिल्हा बीड) यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती बापू काशिनाथ रोडे (वय 48 वर्षे, राहणार पांगरी) हे दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले होते.घरातून निघताना त्यांनी आमच्या नणंदेकडे आणि मित्राकडे जातो असे सांगितले होते. मात्र ते त्या दिवशी घरी परतलेच नाहीत. सुरुवातीला ते नातेवाईकांकडे गेले असावेत असे वाटल्याने कुटुंबीयांनी वाट पाहिली, परंतु दोन दिवस झाले तरी ते घरी न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पांगरीसह परळी, बीड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये असलेल्या सर्व नातेवाईकांकडे, मित्रांकडे आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला. परंतु बापू रोडे यांचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यांचा मोबाईल देखील बंद लागत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

शोध घेऊन तपास न लागल्याने पोलिसात तक्रार

एक महिना उलटूनही पतीचा शोध न लागल्याने मिरा रोडे यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या पतीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून किंवा जबरदस्तीने अपहरण करून नेले असावे असा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.या घटनेमुळे पांगरी गावात आणि रोडे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बेपत्ता व्यक्तीचे वर्णन आणि फोटो पोलिसांनी सर्वत्र पाठवले असून शोध सुरू केला आहे.या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 93/2026, कलम 140(3) बीएनएस 2023 अन्वये अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सफौ उबाळे हे करीत आहेत.

ही बातमी ही वाचा….

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...