गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील आरणगाव येथील एका इसमाची बँकेसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास आरणगाव ता. केज येथील अशोक नामदेव सिरसट हे केज शहरातील अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या एसबीआय बँकेत कामानिमित्त आले होते. त्यांनी त्यांची मोटार सायकल क्र. एमएच-२०/ एफए-२७३३ ही बँकेसमोर हँडल लॉक करून उभी केली आणि ते बँकेत गेले.त्याच वेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांची मोटार सायकल चोरून नेली. बँकेतील काम आटोपून बाहेर आल्यानंतर अशोक सिरसट यांना त्यांची मोटार सायकल जागेवर दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ती आढळून आली नाही.या प्रकरणी अशोक सिरसट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं. ६८६/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राम पवार हे करीत आहेत.
बस स्टँडवरून आणखी एकाची मोटार सायकल चोरण्याचा प्रयत्न
दरम्यान, दि. २९ ऑक्टोबर रोजी माळेगाव ता. केज येथील माणिक गुंठाळ हे त्यांच्या बहिणीला बस मध्ये बसवून देण्यासाठी केज बस स्टँडवर आले होते. त्यांनी त्यांची मोटार सायकल क्र. एमएच-४४/ एल-५९५४ ही बस स्टँड परिसरात असलेल्या पार्किंगच्या जागेवर उभी करून ते बसजवळ गेले.त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोटार सायकलचे लॉक तोडून ती पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र माणिक गुंठाळ यांनी तात्काळ धावपळ करून शोध घेतला असता त्यांची मोटार सायकल बस स्टँडच्या पाठीमागील वस्तीत आढळून आली.मोटार सायकल मिळून आल्याने त्यांनी या प्रकरणी पोलिसात कोणतीही तक्रार दिली नाही, मात्र केज शहरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
