डी. सदानंद/अंबाजोगाई: सायकलिंगची आवड आणि प्रभू श्रीरामावरील अपार श्रद्धा यांचा अनोखा संगम घडवत अंबाजोगाई शहरातील दोन जिगरबाज सायकलपटूंनी एका ऐतिहासिक आणि साहसी सायकल प्रवासाला रवीवार ‍(दि. 01 नोव्हेंबर) पासून सुरुवात केली आहे.

अंबाजोगाईचे सुपरिचित सायकलपटू शरद सूर्यवंशी आणि अतुल वखरे यांनी आज दि. 1 नोव्हेंबर रोजी पहाटे अंबाजोगाई ते अयोध्या या सायकल प्रवासाला सुरुवात केली आहे.या प्रवासाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई शहरातील सर्व सायकलपटू आणि त्यांचे शुभचिंतक पहाटे 5.30 वाजताच शहरातील प्रसिद्ध योगेश्वरी देवी मंदिराजवळ मोठ्या उत्साहात जमले होते. यावेळी दोन्ही सायकलस्वारांनी योगेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेतले, देवीला नमस्कार करून आपल्या या प्रदीर्घ आणि खडतर प्रवासासाठी आशीर्वाद घेतला आणि त्यानंतरच त्यांनी अयोध्येकडे कूच केले.नांदेड – नागपूर या महामार्गे त्यांचा हा संपूर्ण प्रवास होणार असून तब्बल 11 दिवस सायकल चालवत ते उत्तर प्रदेशातील श्रीरामांची नगरी असलेल्या अयोध्येत पोहोचणार आहेत. रोज सरासरी 120 ते 150 किलोमीटर अंतर सायकलवर पार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. उन्हाची तमा न बाळगता, केवळ जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास आणि सायकलिंगवरील प्रेमाच्या जोरावर ते हा प्रवास पूर्ण करणार आहेत.

अनेक लांब पल्ल्याच्या राईड

शरद सूर्यवंशी आणि अतुल वखरे हे दोघेही अंबाजोगाई सायकलिंग ग्रुपचे सक्रिय सदस्य असून त्यांनी यापूर्वीही अनेक लांब पल्ल्याच्या राईड्स यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. मात्र अंबाजोगाई ते अयोध्या हा प्रवास त्यांच्यासाठी सर्वात मोठा आणि आव्हानात्मक असणार आहे.दरम्यान, भल्या पहाटे त्यांना निरोप देण्यासाठी जमलेल्या सायकलप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात आणि ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. या दोन्ही सायकलपटूंच्या साहसी प्रवासाचे अंबाजोगाईसह बीड जिल्हाभरातून कौतुक होत असून त्यांच्या या प्रवासासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...