सोनवळा येथे रंगली आकाशकंदील कार्यशाळा
अंबाजोगाई/प्रतिनिधी: दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आणि या प्रकाशाला अधिक शोभा येते ती हाताने बनवलेल्या आकाशकंदिलाने. याच संकल्पनेतून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनवळा येथे शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) एक आगळीवेगळी आकाशकंदील कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये कला गुणांना वाव मिळावा आणि स्वावलंबनाची भावना रुजावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी प्रसिद्ध चित्रकार श्री. त्र्यंबकजी पोखरकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. पोखरकर सरांनी विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत, कृतीतून आकाशकंदील कसा तयार करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवले. कागदाची घडी, कापकाम, चिकटवणे आणि सजावट या सर्व बारकाव्यांसह त्यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक चंदर सिनगारे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रत्नाकर निकम, मनोज देशमुख, संतोष कदम, श्रीधर देशपांडे, दिपक बिडवे, मुंडे मॅडम, बाळूभाऊ सुरवसे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रकार त्र्यंबकजी पोखरकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील हातात घेऊन काढलेला सामूहिक फोटो हा या कार्यशाळेची आठवण म्हणून कायम राहणार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी चित्रकार त्र्यंबकजी पोखरकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील हातात घेऊन काढलेला सामूहिक फोटो हा या कार्यशाळेची आठवण म्हणून कायम राहणार आहे.
स्वतःच्या हाताने आकाशकंदील
शाळेतील विद्यार्थ्यांचे छोटे-छोटे गट तयार करून प्रत्येक गटाला साहित्य देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक, रंगीबेरंगी आणि विविध आकारांचे आकाशकंदील तयार केले. कोणी गुलाबी, कोणी पिवळा तर कोणी केशरी रंगाचे कंदील बनवून आनंदाने एकमेकांना दाखवत होते. स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूचा आनंद काही औरच असतो, हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

