अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: अंबाजोगाई शहरातील गजबजलेल्या यशवंतराव चव्हाण चौक मोरेवाडी परिसरात मंगळवारी (दि. १०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका टायरच्या दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २:३० वाजताच्या सुमारास दुकानातून अचानक धूर निघू लागला. दुकानात मोठ्या प्रमाणात टायर व रबर असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या प्रचंड ज्वालांसह काळ्याकुट्ट धुराचे लोट दूरवर पसरले. टायर जळत असल्यामुळे आगीमध्ये लहान-मोठे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही घटना चौकाच्या अगदी जवळ घडल्याने वाहनचालक आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, या आगीत दुकानाचे व आतील साहित्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.





