गौतम बचुटे/केज: शहरातील आदर्श वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर सोसायटीमध्ये अखेर प्रतीक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मूर्तीची स्थापना करण्यात आली. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी (दि. १०) सकाळी १० वाजता हा प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.
सोसायटीचे संस्थापक रमाकांत बापू मुंडे आणि उषाताई मुंडे यांच्या हस्ते विधीवत अभिषेक, पूजा करून मूर्तीचे अनावरण करण्यात आले. सोसायटीची स्थापना करताना रमाकांत बापू मुंडे यांनी रहिवाशांच्या सुविधेसाठी बारा गुंठे जागा मंदिर आणि क्रीडांगणासाठी राखीव ठेवली होती. दिलेल्या शब्दानुसार आज मंदिरात मूर्ती स्थापन करून आपण ऋणमुक्त झाल्याची भावना यावेळी बापूंनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “लक्ष्मीनगरसाठी रस्ते, नाली, वीज आणि ओपन स्पेसचे सुशोभीकरण करून येथे एक भव्य मंदिर उभारण्याचा आमचा मानस आहे.”
यावेळी उषाताई मुंडे म्हणाल्या की, लक्ष्मीनगर सोसायटी ही केज शहरात एक आदर्श सोसायटी म्हणून नावाजली जावी, यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
या सोहळ्याला दहिफळ-वडमाऊलीचे माजी सरपंच बाळासाहेब मोराळे, मधुर भैय्या मुंडे, दत्ता घुले, डॉ. अजित तांदळे, बंडू घुले, दत्ता ठोंबरे, भारत हांगे, विलास ठोंबरे, राजाभाऊ घोळवे, रवी मुंडे, सुनील मोरे, भागवत सोनवणे, सचिन घोळवे, गायकवाड सर यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





