अंबाजोगाई/प्रतिनिधी:
पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या सुशोभीकरणाचा गाजावाजा करत अंबाजोगाई नगरपालिकेकडून परळी महामार्गावर करण्यात आलेले वृक्षारोपण केवळ देखावा ठरत असल्याचे समोर आले आहे.
महामार्गावर झाडे लावून अवघे काही दिवस उलटले असतानाच बहुतांश झाडे पूर्णपणे वाळून निष्पर्ण झाली आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अक्षरशः वाया जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे. नगरपालिकेच्या वतीने परळी महामार्गावर मोठ्या थाटामाटात झाडे लावण्यात आली. झाडांच्या संरक्षणासाठी जाळ्या (ट्री गार्ड) देखील बसवण्यात आल्या. मात्र, झाडे लावताना योग्य नियोजनाचा अभाव आणि लागवडीनंतर पाण्याचा पत्ताच नसल्यामुळे उन्हाच्या तडाख्यात या झाडांची पाने पूर्णपणे जळून गेली आहेत. अवघ्या चार दिवसांत झाडांची ही दुरवस्था झाल्याने, केवळ शासकीय निधी लाटण्यासाठीच हे वृक्षारोपण उरकण्यात आले का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
झाडे लावण्याचा फक्त सोपस्कार, संगोपनाकडे दुर्लक्ष
वृक्षारोपणावर दरवर्षी लाखो-कोट्यवधींचा चुराडा केला जातो. परंतु, रोपे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे, नियमित पाणी देण्याकडे पालिकेचे अधिकारी व कंत्राटदार सपशेल दुर्लक्ष करतात. महामार्गावर लावलेली झाडे पहिल्याच आठवड्यात करपून गेल्याने या कामाच्या गुणवत्तेवर आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नागरिकांमधून तीव्र संताप
जनतेच्या कररुपी पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी होत असल्याने अंबाजोगाईकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. केवळ कागदोपत्री आकडे दाखवून निधी हडप करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराची तात्काळ चौकशी करावी, तसेच वाळलेली झाडे बदलून त्यांची योग्य निगा राखण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
