अंबाजोगाई/ बीएन प्रतिनिधी:
अंबाजोगाई तालुक्यातील आंबा साखर कारखाना परिसरात झालेल्या भीषण दुचाकी अपघातात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी भरधाव वेगात रॉंग साईडने येणाऱ्या मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेच्या सुमारास आंबा साखर कारखाना परिसरातील बैलगाडी तळाजवळ घडला. मयत सुशिल तुकाराम पडुळे (वय 17 वर्ष 1 महिना, रा. राजेवाडी, ता. अंबाजोगाई) हा स्वतःची मोटरसायकल चालवत असताना समोरून भरधाव वेगात, निष्काळजीपणे रॉंग साईडने आलेल्या दुसऱ्या मोटरसायकल (क्र. MH13AW3230) ने त्याच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत सुशिल गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. जखमी अवस्थेत त्याला तात्काळ अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान दि. 5 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 8:45 वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मयत सुशिल याचे वडील राजाराम महादेव पडुळे (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 13 ऑक्टोबर 2026 रोजी समोरची दुचाकी क्र. MH13AW3230 च्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोह घोळवे करीत आहेत.

