गौतम बचुटे / केज :1 केज-कळंब मार्गावर एसटी महामंडळाने पर्यावरणपूरक वातानुकूलित ई-बस सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय झाली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, या ई-बसमध्ये विद्यार्थ्यांचा सवलत पास स्वीकारला जात नसल्याने शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

साळेगाव, माळेगाव, मांगवडगाव या पट्ट्यातील शेलगाव गांजी, बोबडेवाडी, सुकळी, सातेफळ, हदगाव, डोका, सारूकवाडी, चिंचोली माळी आदी गावांतील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज केज आणि कळंब येथे ये-जा करतात. पूर्वी या मार्गावर साध्या लालपरी बसेस होत्या, त्यात विद्यार्थी पास चालत होता. मात्र, काही दिवसांपासून कळंब आगाराने या मार्गावर फक्त ई-बस सुरू केल्या असून साध्या बसेस बंद केल्या आहेत.ई-बसमध्ये विद्यार्थी पासची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडत असून अनेक मुलींना शिक्षण थांबवावे लागण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर साळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास जाधव पाटील यांनी बुधवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी कळंब आगार प्रमुख घोलप यांना निवेदन दिले. ई-बसमध्येही नियमानुसार विद्यार्थी पास स्वीकारून पासधारक विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा द्यावी, अन्यथा सकाळ-संध्याकाळच्या वेळेत साधी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी सरपंच कैलास जाधव, पत्रकार गौतम बचुटे आणि सुधाकर इंगळे यांनी आगार प्रमुख घोलप यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची अडचण समजून घेत घोलप यांनी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून साध्या बसेसची संख्या वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान, विद्यार्थी आणि पालक वर्गातून लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...