बर्दापूर/प्रतिनिधी:
शेतातील विहिरीवरून पाणी उपसण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेसह तिच्या मुलांना शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या दांड्याने व चाकूने मारहाण केल्याची घटना बर्दापूर शिवारात घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे बर्दापूर शिवारातील शेतात १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी इलियासखाँ पठाण याने फिर्यादी फरजाना अमजद पठाण (वय ३५ वर्षे) यांच्या लहान मुलास विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फरजाना पठाण यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, आरोपी साबेर पठाण याने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून त्यांना जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचा लहान मुलगा मध्ये आला असता, आरोपी जुबेर पठाण याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर फिर्यादीचा मोठा मुलगा शेतात येत असताना आरोपी इस्राईल पठाण याने हातातील चाकूने त्याच्या पाठीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी फरजाना अमजद पठाण यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलिसांनी:
- इलियासखाँ लालखा पठाण
- इस्राईल इलियासखाँ पठाण
- जुबेर इलियासखाँ पठाण
- साबेर इलियासखाँ पठाण (सर्व रा. बर्दापूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड)
या चौघांविरुद्ध (गु.र.नं. २४८/२०२६) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
