विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर नगरीत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या मध्येच मोठ्या प्रमाणात खडी आणि दगड-गोटे टाकून काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले आहे.

अंबाजोगाई-अहमदपूर राज्य महामार्ग क्रमांक 548 ड वरून घाटनांदूर नगरीत प्रवेश करणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील मुख्य रस्त्याची संपूर्णत: विल्हेवाट लागली आहे. या प्रमुख मार्गावर खड्ड्यांनी आपले दिमाखदार साम्राज्य स्थापन केले असून, नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खडीचे ढिगारे पडले आहेत. डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून केवळ मुरूम आणि दगड शिल्लक राहिले आहेत.

अपघाताची शक्यता

दुचाकीचे चाक या खडीत घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे या मार्गावरून दुचाकी चालवणे देखील अवघड झाले आहे. लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, रस्त्यालगत असलेल्या दुकानदार आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुकानदारांना श्वसनाचा त्रास

धुळीमुळे दुकानातील साहित्य खराब होत असून श्वसनाचा त्रास वाढला आहे.विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ग्रामपंचायत कार्यालयाकडे आणि कुरेशी मोहल्ल्यातून बाजार चौकाकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच चौकातून पुढे अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. चांगल्या सिमेंट रस्त्यावरून थेट खड्ड्यात आणि खडीत आल्याचा धक्कादायक अनुभव वाहनधारकांना येत आहे.

जीव मुठीत धरुन प्रवास

हा रस्ता घाटनांदूरसाठी मुख्य प्रवेशद्वार असून, दररोज शेकडो वाहने, शाळकरी मुले, प्रवासी येथून ये-जा करतात. शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून या खडीतून जावे लागत आहे.त्यामुळे हा रस्ता तात्काळ योग्य पद्धतीने दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिक, वाहनधारक, दुचाकीस्वार आणि प्रवाशांमधून होत आहे. प्रशासन याकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहा रस्त्याची अवस्था…..

व्हिडिओ बातमी

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.