गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील साळेगाव येथील शेतकरी दत्तू सिताराम लांडगे यांनी 7/12 वरील नाव विनाकारण कमी केल्याच्या निषेधार्थ उद्या दि. 27 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय, केज समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत तहसीलदारांनीच पोलीस ठाण्याला अधिकृत पत्र दिल्याने खळबळ उडाली आहे.शेतकरी लांडगे यांचे म्हणणे आहे की, साळेगाव येथील सर्वे नं. 286, गट नं. 559 मधील त्यांची जमीन 7/12 वर होती, ती ऑनलाईन रेकॉर्डवरून कमी करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी दि. 09.10.2026 रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले होते, पण दखल घेतली गेली नाही.
या इशाऱ्यानंतर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय केज यांनी दि. 12.10.2026 रोजी पत्र क्र. 2026/एमएजी/कावि/691 अन्वये पोलीस निरीक्षक केज यांना पत्र पाठवले. या पत्रात म्हटले आहे की, दि. 27.10.2026 रोजी सकाळी 11 वाजता लांडगे हे तहसील दरवाजासमोरच आमरण उपोषणास बसणार असून वेळप्रसंगी आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी कळवले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा.या पत्राची दखल घेत पोलीस ठाणे केज ने दि. 19.10.2026 रोजी जा.क्र. 4554/26 अन्वये आदेश काढला आहे.
पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांनी या आदेशात चिंचोलीमाळी बीटच्या 4 कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, अर्जदाराची समक्ष भेट घेऊन चर्चा करून त्यांना आत्मदहनापासून परावृत्त करावे. तसेच त्यांचे म्हणणे खरे-खोटे तपासून प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि त्याचा अहवाल दि. 26.10.2026 रोजी 11 वाजेपर्यंत सादर करावा.महसूलच्या ऑनलाईन चुकीमुळे शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे.
