गौतम बचुटे/केज :- केज आणि युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेग वेगळ्या गावातून दोन पंधरा वर्षीय मुलींचे अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी अपहरण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
पहिली घटना – केज शहर:
दि. २५ ऑक्टोबर रोजी केज शहरातील एका भागात, वडील कामासाठी बाहेरगावी गेले असताना, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ हे घरात तिच्या आई सोबत झोपलेले असताना रात्री १०:३० च्या सुमारास तिचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची घटना घडली.
दुसरी घटना – युसूफवडगाव हद्द:
तर दुसऱ्या घटनेत युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील ९ वी च्या वर्गात शिकत असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०० च्या सुमारास नळावर पाणी आणण्यासाठी गेली असता तिचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे.या प्रकरणी केज आणि युसूफवडगाव पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या दोन स्वतंत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अनुक्रमे केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आसद शेख आणि युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल गोविंद बडे हे करीत आहेत.
