विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ: परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख विक्रीच्या मंजूर आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या मागासवर्गीय महिलांनी मंगळवारी (दि. 27) मुख्य अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी वेळीच धाव घेत हा प्रकार रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
महाजेनकोच्या परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाने मागासवर्गीय महिलांच्या नावावर राख विक्रीसाठी दोन सेल ऑर्डर क्रमांक 05211 आणि 05212 जारी केले होते. या संदर्भातील अधिकृत परवानगी आदेश 9 सप्टेंबर 2026 रोजी देण्यात आला होता.आदेश हातात असूनही गेल्या दीड महिन्यापासून प्रत्यक्षात राख उचल आणि विक्रीसाठी कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. मंजुरी मिळूनही काम रखडल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे महिलांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही या महिलांनी वेळोवेळी आंदोलन आणि उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आत्मदहनाचा अंतिम इशारा देऊनही दखल घेतली गेली नाही, म्हणून आजचा टोकाचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात तणावाचे वातावरण होते. या आरोपांबाबत केंद्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
जातीय भेदभावाची चौकशी करा
या प्रकरणात मुद्दामहून अडथळे आणले जात असून आमच्यासोबत जातीय भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलक महिलांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मंजूर आदेश का थांबवले आहेत, याची लेखी कारणे द्यावीत, यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रखडलेले आदेश तात्काळ लागू करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
