गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील साळेगाव येथे महावितरणच्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांच्या घर्षणाने चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.दि. 26 ऑक्टोबर, सोमवार रोजी दुपारी साळेगाव येथील माजी उपसरपंच श्रीमंत आत्माराम गीते आणि मल्हारी जयवंत गित्ते या दोन शेतकऱ्यांच्या शेतात ही दुर्घटना घडली.
महावितरणच्या खांबावरील लोंबकळणाऱ्या तारांचा एकमेकांशी संपर्क आल्याने ठिणगी पडून ऊसाने पेट घेतला. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि चार एकर क्षेत्रातील उभा ऊस जळून खाक झाला.या आगीत केवळ ऊस पीकच नव्हे, तर शेतात टाकलेले ठिबक सिंचनाचे पाईप, लॅटरल आणि इतर साहित्यही जळून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळ आणि कमी पावसामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
केज तालुक्यात वारंवार घटना
केज तालुक्यात ऊस आणि सोयाबीनला आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत साळेगाव, बनकरंजा, नांदूरसह अनेक ठिकाणी अशा आगी लागल्या आहेत. याचे मुख्य कारण महावितरण कंपनीचा गलथान कारभार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत, खांब झुकले आहेत, मात्र महावितरणकडून दुरुस्ती केली जात नाही. तारांच्या घर्षणातून निघणाऱ्या ठिणग्यांमुळे शेतातील पिके आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. महावितरणने तातडीने सर्वेक्षण करून लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त कराव्यात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
