बनसारोळा/प्रतिनिधी: केज तालुक्यात दुष्काळाने आधीच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. आता चोरट्यांनीही शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक साधनांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. केज तालुक्यातील बनसारोळा – औरंगपूर शिवारामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यातून तब्बल १ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ५ शेळ्या आणि २ बकरे अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

केज तालुक्यातील बनसारोळा येथील शेतकरी अशोक सुरेश गोरे (वय २७ वर्षे, रा. बनसारोळा, ता. केज) यांचे औरंगपूर शिवारातील सर्व्हे नंबर ८९ मध्ये शेत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी शेतातील शेडमध्ये १७ शेळ्या-बकरे पाळले होते. ही शेळीपालनच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते.दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता गोरे यांनी नेहमीप्रमाणे शेळ्यांना शेडमध्ये बांधून ते घरी गेले. मात्र, या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात शेडमध्ये प्रवेश केला. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जेव्हा ते शेतात गेले, तेव्हा १७ पैकी ५ शेळ्या आणि २ बकरे जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी अतिशय शिताफीने ७ जनावरे चोरून नेली होती. या चोरीस गेलेल्या जनावरांची एकूण किंमत सुमारे १ लाख ६५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुष्काळामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ

यंदा केज तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपून गेली आहेत, हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी शेळीपालन, दुग्धव्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, शेतकऱ्यांची हीच मजबुरी हेरून चोरट्यांनी तालुक्यात धुमाकूळ घातला आहे.गेल्या महिनाभरात केज, युसूफ वडगाव, बनसारोळा, औरंगपूर परिसरात शेळी चोरी, मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुष्काळामुळे काम नसल्याने चोऱ्या वाढल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. शेतकरी दिवसा शेतात राबतो आणि रात्री चोरट्यांच्या भीतीने जागरण करतो, अशी दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर फिर्यादी अशोक गोरे यांनी तातडीने युसूफ वडगाव पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून दिनांक २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.०९ वाजता युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या घटनेमुळे बनसारोळा आणि औरंगपूर शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी बनसारोळा येथील शेतकऱ्यांमधून होत आहे. पुढील तपास युसूफ वडगाव पोलीस करत आहेत.

हि बातमी ही वाचा…

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...